
इंटेल करणार भारतात सेमीकंडक्टरची निर्मिती
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी इंटेल भारतात सेमीकंडक्टर उत्पादन युनिट स्थापन करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टरचे संशोधन, नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सेमीकंडक्टर उत्पादनाचे केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंटेल कंपनीने हा निर्णय घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार दि. २८ डिसेंबर रोजी ट्वीट करून इंटेलचे भारतात स्वागत आहे, असे म्हटले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताला हाय-टेक उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी देशातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमसाठी ७६,००० कोटींच्या धोरणाला मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंटेलने केलेली घोषणा अतिशय महत्त्वाची आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सेमीकंडक्टर मोठी आणि निर्णायक भूमिका बजावते. जगभरात सेमीकंडक्टर मोठी मागणी आहे. सेमीकंडक्टर उत्पादनात भारत प्रमुख देश होईल, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
सरकारने सिलिकॉन सेमीकंडक्टर फॅब, डिस्प्ले फॅब, कंपाऊंड सेमीकंडक्टर, सिलिकॉन फोटोनिक्स, सेन्सर्स फॅब, सेमीकंडक्टर पॅकेजिंक आणि सेमीकंडक्टर डिझाइनमध्ये गुंतलेल्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी धोरण तयार केले आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्सची स्थापन करणा-या कंपन्यांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य देणार आहे.
सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचे पायाचे दगड
उद्योग ४.० अंतर्गत डिजिटल परिवर्तनाच्या पुढच्या पायरीवर जाण्यासाठी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचे पायाचे दगड आहेत. ही अत्यंत गुंतागुंतीची आणि तंत्रज्ञान-केंद्रित क्षेत्रे आहेत. ज्यामध्ये प्रचंड भांडवली गुंतवणूक, मोठी जोखीम, दीर्घ प्रक्रिया आणि परतावा कालावधी आणि तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल अंतर्भूत असणारी आणि लक्षणीय प्रमाणात शाश्वत गुंतवणूक करावी लागणारी प्रक्रिया आहे.
काय आहे केंद्राचा कार्यक्रम?
हा कार्यक्रम भांडवली पाठबळ आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी यांच्या सुविधा उपलब्ध करून देऊन सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले निर्मिती क्षेत्राला मोठी चालना देईल. सिलिकॉन अर्धवाहक फॅब्स, दृश्य पडदा फॅब्स, संयुक्त अर्धवाहक चकत्या, सिलिकॉन फोटॉनिक्स, संवेदक फॅब्स, अर्धवाहक पॅकेजिंग यामध्ये कार्यरत असणा-या कंपन्या उद्योग संघ यांना आकर्षक मदत निधीचे पाठबळ पुरविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
चीन, तैवानमध्ये मोठे उत्पादन
चीन आणि तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टरचे उत्पादन होते. भारत चीनला शह देण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी सेमीकंडक्टरचा तुटवडाही निर्माण झाला होता. सेमीकंडक्टरच्या बाबतीत चीनवरील अवलंबित्व करण्यासाठीची चर्चा सुरू होती.