
आस्मानी संकटापुढे बळीराजा हातबल
प्रतिनिधी / सोलापूर :
जिल्हयात बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने गुरूवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्ष, डाळींब, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून ऊसतोडणी कामगाराचे जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरूवारी दिवसभर सुर्यदर्शनही झाले नाही.
जिल्हयात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. बुधवारी मध्यरात्री माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा व मोहोळ तालुक्यात नुकसानकारक पाऊस झाला. रात्रभर झालेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळींब, केळीसह कांदा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व मंगळवेढा तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे.
करमाळा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात पावसामुळे अनेक द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. सध्या सर्वत्र साखर कारखाने सुरू असुन ऊस तोडणीचा हंगाम मोठया प्रमाणात सुरू आहे. पावसामुळे ऊसतोडणी खोळंबली आहे. परजिल्हयातून मोठया संख्येने ऊसतोडणी कामगार जिल्हयात आले आहेत. या मजुरांचे निवा-या१अभावी हाल होत आहेत.
सध्याचा पाऊस हा अवकाळी असून द्राक्ष व कांदा पिकांसाठी मोठया प्रमाणात नुकसानकारक आहे. द्राक्षांवर भुरी, दावण्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच फुलोरा अवस्थेतील द्राक्ष पीक पूर्णपणे गळुन पडले आहे. मोठया पावसामुळे तयार झालेल्या द्राक्षांच्या घडांचे नुकसान होत आहे.
माळशिरस, करमाळा व माढा परिसरात रात्रभर भिज पाऊस झाला. या परिसरात ५५ ते ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पिरसरातील द्राक्ष व कांदा पिकांचे नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे.