आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा रद्द

Read Time:2 Minute, 57 Second

मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागाच्या गट क अंतर्गत येणारी आरोग्य विभागाची १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेसंबंधी नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाची ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या आधी १५ आणि १६ ऑक्टोबरला या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार होती, तर १७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून यासाठीच्या पात्र उमेदवारांची यादीसुद्धा जारी करण्यात येणार होती. आता ही परीक्षा रद्द करण्यात येणार असून नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

आरोग्य सेवक भरतीची ही परीक्षा मार्च २०१९ पासून रखडलेली आहे. या आधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित भरतीचे विस्तृत वेळापत्रक आणि त्याबद्दलचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. मार्च २०१९ च्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी सबंधित गट-क पदांच्या भरती बाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता.

गट क मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ पदासाठी ही मुख्यत्वे करून भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा जिल्हा निवड मंडळामार्फत घेतली जाईल.

दरम्यान गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड प्रवर्गासाठी परीक्षा झाली होती. त्यावेळी या परीक्षेत घोळ झाल्याचे समोर आले. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + three =