August 19, 2022

आयकरची धमकी देऊन पैसे वसुली, मुंबईत तीन पोलिस अधिका-यांवर गुन्हा

Read Time:3 Minute, 18 Second

मुंबई : आयकर विभागाची धमकी देऊन अंगडियांना त्यांच्या व्यवसायात अडचणी आणत पैसे वसुली करणा-या लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तीन अधिका-यांविरूद्ध त्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक निरीक्षक नितीन कदम, उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलिसांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणात गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययू) ने कदम आणि जमदाडे यांना अटक केली असून, न्यायालयाने दोघांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अंगडियांचे व्यवहार हे रोखीने चालत असून मुंबादेवी परिसरात त्यांची अनेक कार्यालये आहेत. लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील काही अधिकारी व्यवसाय करू देत नसून चौकशीच्या नावाखाली त्रास देतात. तसेच रोखीच्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला देण्याची धमकी देऊन पैसे उकळत असल्याची तक्रार मुंबादेवी येथील अंगडिया असोसिएशन यांच्यामार्फत पोलिसांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले होते.

अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांनी याबाबत अंगडिया तसेच निरीक्षक ओम वंगाटे, सहायक निरीक्षक नितीन कदम, उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्यासह त्यांच्या पथकातील इतर पोलिसांची कसून चौकशी केली. मुंबादेवीच्या पोफळवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही, पोलिस डायरीमधील नोंदी, पोलिसांचे जबाब यावरून या अधिका-यांनी बेकायदा वसुली केल्याचे दिसून आले. त्यावरून दिलीप सावंत यांच्या तक्रारीवरून हे अधिकारी कार्यरत असलेल्याच पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांना अटक
या प्रकरणी कदम आणि जमदाडे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्या दोघांनाही न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधिका-यांविरोधात ते सेवेत असलेल्या पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आल्याने आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई केली गेल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five + eighteen =

Close