August 19, 2022

‘आयएएस’, ‘आयपीएस’सह १० लाख नोक-या उपलब्ध

Read Time:2 Minute, 27 Second

नवी दिल्ली : येत्या दीड वर्षांत १० लाख सरकारी नोक-या उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली.

विशेष करून या सरकारी नोक-या रेल्वे, पोस्ट, संरक्षण क्षेत्र आणि गृह खाते या विभागातील असतील. याशिवाय आयएएस दर्जाची १ हजार ४७२ पदे तर आयपीएस दर्जाची ८६४ पदे रिक्त असून ती देखील लवकरच भरली जातील अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

राज्यसभेत एका लेखी उत्तरात जितेंद्र सिंह यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. थेट भरती झालेल्या आयएएस अधिका-यांच्या सेवांचा पूर्ण वापर सुनिश्चित करण्यासाठी, नागरी सेवा परीक्षा-२०१२ नंतर सरकारने नागरी सेवा परीक्षेद्वारे त्यांची वार्षिक भरती १८० पर्यंत वाढवली आहे.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी ही नागरी सेवकांसाठी देशातील प्रमुख प्रशिक्षण संस्था आहे. नागरी सेवा परीक्षा २०२० पासून, कढर अधिका-यांच्या प्रशिक्षण तुकडीमधील उमेदवारांची संख्या २०० झाली आहे. विविध राज्यांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत १,४७२ आणि भारतीय पोलिस सेवेत ८६४ पदे रिक्त आहेत. विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये एकूण मंजूर पदांची संख्या ४०,३५,२०३ आहे आणि त्यापैकी ९,७९,३२७ पदे रिक्त आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी थेट भरतीच्या आधारावर आयएएस आणि आयपीएस श्रेणीतील रिक्त जागा भरण्यासाठी नागरी सेवा परीक्षा आयोजित करते. याव्यतिरिक्त, पदोन्नती कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी ‘यूपीएससी’द्वारे राज्य सरकारांसह निवड समितीच्या बैठका आयोजित केल्या जातात.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × three =

Close