January 19, 2022

आमदार पुत्रासह मंत्र्यांचा काँग्रेस प्रवेश

Read Time:2 Minute, 12 Second

डेहराडून : उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकारमधील मंत्री यशपाल आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तराखंडमध्ये आर्य हे दलित समाजातील बडे नेते आहेत. यशपाल आर्य यांच्यासबोत त्यांचे आमदार पुत्र संजीव आर्य यांनीही काँग्रेसचा हात धरला आहे.

यशपाल आर्य यांनी २०१६ मध्ये काँग्रेसला राम राम केला होता. त्यांनी ९ काँग्रेस आमदारांसह भाजप प्रवेश केला होता. आता ५ वर्षांनी ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. भाजपने यशपाल यांना कॅबिनेट मंत्री केले होते. तसेच, मुलगा संजीव आर्य यांनासुद्धा तिकिट दिले होते. निवडणुकीच्या आधीच यशपाल हे काँग्रेसमध्ये आल्याने याचा भाजपला फटका बसू शकतो. उत्तराखंडच्या राजकारणातील यशपाल आर्य हे सध्याचे मोठे नाव आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने अर्थातच काँग्रेसला पुन्हा राज्यात नवसंजीवनी मिळू शकते. १९८९ मध्ये यशपाल आर्य यांनी पहिल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतली होती. १९९३ ते १९९६ या कालावधीतसुद्धा ते आमदार होते.

२००२ मध्ये उत्तराखंडच्या निर्मितीनंतर ते उत्तराखंडचे आमदार झाले. २००७ च्या निवडणुकीतही यशपाल यांनी विजय मिळवला होता. २००२ ते २००७ या कालावधीत यशपाल आर्य हे विधानसभेचे अध्यक्षसुद्धा होते. आर्य हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा होते. यशपाल हे सध्याच्या उत्तराखंड सरकारमध्ये मंत्री असून, त्यांच्याकडे परिवहन आणि समाजकल्याण खाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 5 =

Close