August 19, 2022

आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक

Read Time:3 Minute, 6 Second

आपण मिळून राज्याला गतवैभव मिळवून देऊ : फडणवीस

मुंबई : भाजप आणि शिवसेना कधी वेगळी होईल, असे वाटले नव्हते, पण काही काळ आपण दूर झालो. आता आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता आपण मिळून महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ असेही ते म्हणाले. शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. मूळ परिवार एक झाला आहे. आपल्यासोबत आलेले हे बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन जे सोबत आले, त्यांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आपल्याला ताकद दिली आहे. आता एकत्र वाटचाल करायची आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव आपल्याला सर्वांना मिळून प्राप्त करून द्यायचे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी आमदारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आज ख-या अर्थाने शिवसेना-भाजप युतीचे सरकार आपल्यासमोर आहे, बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले. या आधी सावरकरांचा अपमान करणारे सरकार होते, दाऊदसोबत संबंध असणारे लोक सरकारमध्ये होते. हे सारे अस्वस्थतेचे विषय बनत चालले होते. शिवसेनेचे अधिक नुकसान होतेय, हे पाहणे त्रासदायक होते. नेतृत्वाला सांगण्याचे प्रयत्न खूप झाले, पण दुर्दैवाने त्यात यश आले नाही. म्हणून आजची स्थिती निर्माण झाली.

मुख्यमंत्री म्हणाले की, आपण मतदारांना न्याय देऊ शकलो नाही, तर आपल्या आमदारकीचा उपयोग काय, हाच सर्वांचा विचार होता. येत्या वर्षभरात अडीच वर्षाच्या कामाचा अनुशेष भरून काढू, देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेतच. त्यांना कामाचा अनुभव प्रचंड आहे. कठीण कामे सोपी कशी करायची हे त्यांना ठाऊक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांनी दिली. त्यांचा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचासुद्धा मी आभारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five + five =

Close