आता शिंदे गटाकडूनच व्हीप

Read Time:3 Minute, 3 Second

शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यात हजर राहण्यास सांगितले

मुंबई : पक्षात फूट पाडल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांविरोधात नवा डाव टाकला आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांना व्हीप बजावला आहे. या १६ आमदारांनी गोव्यात तातडीने दाखल व्हावे, असा व्हीप जारी केला आहे. आमचाच पक्ष हा शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे आता या दाव्यावरून कायदेशीर संघर्ष होणार असल्याचे म्हटले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे गट आता अधिक आक्रमक झाला आहे. विधीमंडळात आमचाच पक्ष शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाने आपल्याकडे शिवसेना आणि अपक्षांसह ५० आमदार असल्याचे म्हटले आहे. गोव्यात आज शिंदे गटाची बैठक झाली. यामध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत आक्रमक भूमिका या गटाने घेतली आहे. या गटाने व्हीप काढला असून शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यातील हॉटेलमध्ये बोलावले आहे. त्यांनी व्हीपचे पालन करावे असेही त्यांना म्हटले आहे. व्हीपचे पालन न झाल्यास १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेले भाषण हे केवळ भावनिक होते. पण, भावनेच्या पलिकडे विकास असतो, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले. आम्ही अजूनही शिवसेनेत असून विधिमंडळ पक्ष आमचा असल्याचा दावा त्यांनी केला. या गटात न आलेल्या १६ आमदारांना अपात्रतेचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही केसरकरांनी दिला. आज गोव्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

निवडणूक आयोगाकडे जाणार
एकनाथ शिंदे गट आता निवडणूक आयोगाकडे धाव घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर आणि पक्षावर दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे काही खासदारही शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − 10 =