
आता लसीकरणावरही राजकारण?
मुंबई : राज्यातील लसीकरणावरून एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करत आहेत. अशातच काँग्रेस आमदारानेच शिवसेनेला आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का? असा सवाल केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.
काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना मंत्री अनिल परब यांना धारेवर धरलं आहे. झिशान सिद्धिकी म्हणाले की, वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मी या मतदारसंघाचा स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आहे. तरीही प्रोटोकॉलनुसार मला या कार्यक्रमाला निमंत्रितही केले नाही. आता शिवसेना लसीकरणावरही राजकारण खेळणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
झिशान सिद्धिकी यांच्या आरोपावरून भाजपा आणि मनसेनेही ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा आमदार राम कदम म्हणाले की, आम्ही नाही तर महाराष्ट्र सरकारमध्ये भागीदारी असलेले काँग्रेस पक्षाचे नेते सांगतायेत. ठाकरे सरकार लसीकरणावरही राजकारण करत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काँग्रेसला कसं लाचार बनवलं आहे हे राहुल गांधींनी बघावं. तुमचा पक्ष सर्वांसमोर अपमानित होत आहे. काय दिवस आलेत? असा टोला त्यांनी लगावला आहे.