
आता पाचवी, आठवीच्याही शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर…
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे २०२१ रोजी पार पडणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात विविध प्रवेश परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेबाबतही संभ्रम वाढला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिष्यवृत्ती परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय आज घेण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३ मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी जाहीर करण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा २३ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली.