August 9, 2022

आता नांदेडमध्ये मूक आंदोलन; खा. संभाजीराजे यांचा इशारा, …तर २ मिनिटांत महाराष्ट्र पेटवू

Read Time:4 Minute, 35 Second

मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणारे भाजपा खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा लढा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. आता पुढचे मूक आंदोलन नांदेड येथे २० ऑगस्ट रोजी होणार असल्याचे संभाजीराजेंनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत म्हटले आहे. आपण मराठा आरक्षणाची लढाई संयमाने लढत आहोत. तसे तर २ मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो. पण आपल्याला ते करायचे नाही, असेही संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. त्यासंदर्भात तर्कवितर्क लढवणा-यांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही सामंजस्याची असल्याचे संभाजीराजेंनी अधोरेखित केले. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मतभेद विसरून एकत्र आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. २ मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो. पण आपल्याला ते करायचे नाही, असं सांगत संभाजीराजेंनी ही लढाई संयमानेच लढली जाईल, असे स्पष्ट केले.

वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते, ते आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचे आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे, असे संभाजीराजेंनी या बैठकीत सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरला घरी जाऊन भेटले, त्यावेळी अनेकजण महाराज मॅनेज झाले वगैरे चर्चा सुरू झाल्या, पण ज्या दिवशी मॅनेज होईल, त्या दिवशी घरी बसेल. छत्रपती मॅनेज होणार नाहीत, माझ्यावर विश्वास ठेवा, अशा शब्दांत संभाजीराजेंनी टीकाकारांना सुनावले. यावेळी त्यांनी आता पुढील मूक आंदोलन नांदेड येथे करणार असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले. २० ऑगस्ट रोजी नांदेड येथे मूक आंदोलन होणार आहे, अशी घोषणाही यावेळी मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी केली.

आता जीआर काढून दाखवा
सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्ही आरक्षणात काहीही करू शकणार नाही. ज्या लोकांना समाजाबद्दल काही माहिती आहे असे लोक सदस्य पाहिजेत, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. माझी बाजू मांडण्याची भूमिका मी घेत आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

२२ मागण्यांचे काय?
आरक्षण अनेक दिवस चालेल. पण आपल्या मागण्यांचे काय, असा प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्र्यांसोबत २२ मागण्यांसाठी बैठक झाली. मात्र, अजून यात काहीच केले नाही, आता सरकारने वसतिगृहाबाबत जीआर काढून दाखवावा. दोन महिने झाले आहेत, असेही संभाजीराजे म्हणाले.

आझाद मैदानावर उपोषणाची तयारी
मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली. माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची तयारी आहे. तुम्हीच ठरवा आणि सांगा, असे खा. संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − nine =

Close