January 21, 2022

आता घर खरेदीदारांची फसवणूक थांबणार

Read Time:3 Minute, 11 Second

नवी दिल्ली : देशात अनेक बिल्डर्स घर खरेदी करण्यापूर्वी वेगळे स्वप्न दाखवतात आणि प्रत्यक्षात मात्र संबंधित सुविधा घर खरेदीदारांना देतच नाहीत. त्यामुळे आयुष्यभर कष्ट करून जमवलेला पैसा खर्च करूनही आपल्या स्वप्नातले घर मिळत नाही. पण पैसे आधीच दिल्यामुळे घराशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे घर खरेदीदारांना आता नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता घर खरेदीदारांची आर्थिक फसवणूक आता टळली जाणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी घर खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ठरल्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून न दिल्यास आणि अपूर्ण प्रकल्पाचा ताबा ग्राहकांना दिल्यास आता बांधकाम व्यावसायिकांना भरपाई द्यावी लागणार आहे. बिल्डरांनी खरेदीदारांना दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करावे लागेल, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने म्हटले की, प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांशिवाय फ्लॅट वितरित करणे किंवा खरेदीदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे सुविधा न दिल्यास म्हणजेच प्रकल्प अपूर्ण राहिल्यास बिल्डरांना आरडब्ल्यूएला नुकसान भरपाई द्यावी लागेल.

दिल्लीनजीक असणा-या गौतम बुद्धनगर (नोएडा) येथील एका प्रकल्पाशी संबंधित प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होती. येथील बिल्डर पद्मिनी इन्फ्रास्ट्रक्चरने १८ वर्षांपूर्वी घर खरेदीदारांना वॉटर सॉफ्टनिंग प्लांट, हेल्थ क्लब, स्विमिंग पूल आणि अग्निशमन यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे वचन दिले होते. पण संबंधित बिल्डर्सने ग्राहकांची फसवणूक करून वरील कोणतीही सुविधा दिली नाही आणि आहे त्या स्थितीत ग्राहकांना फ्लॅट्स वितरीत केले होते. या प्रकरणात मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या सुनावणीनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला आहे, तर दोषी बिल्डर कंपनीला ६० लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × two =

Close