आतापर्यंत ४ विमानांतून ११०० विद्यार्थी मायदेशात

Read Time:2 Minute, 54 Second

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी सरकारकडून ऑपरेशन गंगा चालवले जात आहे. आतापर्यंत ४ फ्लाइटमधून १,१४७ लोकांना भारतात परत आणण्यात आले आहे. शनिवारी रात्री मुंबईत पहिले विमान दाखल झाल्यानंतर इतर तीन विमाने राजधानी दिल्लीत दाखल झाले. आतापर्यंत चार विमानांतून विद्यार्थी मायदेशात परतले आहेत.

युक्रेन हल्ल्याच्या चौथ्या दिवशी रोमानियातील बुखारेस्ट येथून १९८ भारतीयांना घेऊन चौथे विमान रविवारी संध्याकाळी ६.४५ वाजता दिल्लीत पोहोचले. तत्पूर्वी रविवारीच ४९० भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया आणि हंगेरीमार्गे भारतात आणण्यात आले. रोमानियाहून एअर इंडियाचे विमान शनिवारी रात्री ९.३० वाजता उड्डाण करून रविवारी पहाटे ३ वाजता दिल्लीला पोहोचले.

हंगेरीतील बुडापेस्ट येथूनही एक विमान आले. त्यामध्ये २४० भारतीय होते. विमानात बसलेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी शनिवारी रात्री ८ वाजता एअर इंडियाचे विमान २१९ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. त्यानंतर आज तीन विमानांतून राजधानी दिल्लीत विद्यार्थी दाखल झाले.

पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या सद्यस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. पंतप्रधानांनी अधिका-यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, प्रत्येक भारतीयाचे सुरक्षित परतणे सुनिश्चित केले पाहिजे. या बैठकीत युक्रेनच्या लढाऊ भागात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची योजनाही पंतप्रधानांसमोर मांडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 1 =