January 22, 2022

आणखी ४ लस उपलब्ध!

Read Time:4 Minute, 36 Second

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण बहुतेक राज्यांकडे लसीचा पुरेसा साठा नसल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे. अशातच आता केंद्र सरकारने एक चांगली बातमी दिली आहे. देशातील लसींचा तुटवडा दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे. देशात लवकरच कोरोनावरील आणखी ४ लसी उपलब्ध होणार आहेत.

लसीकरणाला वेग देण्यासाठी देशात लसींचे उत्पादन सतत वाढवले जात आहे. आणखी ४ लसी देशात उपलब्ध होणार आहेत. यात बायो-ईची लस, जायडसची डीएनवर आधारीत लस, भारत बायोटेकची नाकाद्वारे घेण्यात येणारी लस आणि जिनेव्हाची लस उपलब्ध होणार आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशात लसींचे २०० कोटी डोसचे उत्पादन झालेले असेल, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.

कोविड सुरक्षा योजनेनुसार जायडस कॅडिला, बायो ई आणि जिनेव्हाच्या कोरोनावरील लसींचे उत्पादन देशात करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक पाठबळ देत आहे. याशिवाय नॅशनल लॅबकडून त्यांना तंत्रज्ञानाचे सहकार्य देण्यात येत आहे. भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्यात येणा-या एका डोसच्या लसीसाठीही केंद्र सरकार निधी देत आहे. हे जगभरासाठी एक गेमचेंजर असेल, असे डॉक्टर पॉल यांनी सांगितले.

२०० कोटी डोसचे वर्षाअखेरपर्यंत उत्पादन
कोरोनावरील लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाही आपली उत्पादन क्षमता ६.५ कोटी डोस प्रतिमहिन्यावरून ११ कोटी डोस प्रतिमहिना करणार आहे. सरकारकडून करण्यात येणा-या प्रयत्नांमुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत २०० कोटी डोसचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

लसींसाठी फायजर आणि मॉडर्नाशी चर्चा
लसीसाठी फायजर आणि मॉडर्ना कंपन्यांशी केंद्र सरकारची चर्चा सुरू आहे. फायजरने जुलै आणि ऑक्टोबरदरम्यान लसीचे ५ कोटी डोस देण्याची तयारी दर्शवली आहे. पण कंपनीने काही सूट मागितली आहे. त्यावर भारत सरकारच्या अधिका-यांशी चर्चा झाली आहे. यासंदर्भात एक बैठक याच आठवड्यात झाली आहे, असे पॉल यांनी सांगितले.

स्पुटनिकचे आणखी ६ कंपन्यांत उत्पादन
रशियाच्या कोरोनावरील स्पुटनिक लसीचे देशात लवकरच उत्पादन सुरू होणार आहे. कारण भारतीय कंपन्यांनी तंत्रज्ञान हस्तांतराचे काम पूर्ण झाले आहे. भारत सरकार रशियाशी चर्चा करत आहे. यामुळे डॉक्टर रेड्डींसोबत ताळमेळ साधून आणखी ६ कंपन्या स्पुटनिक लसीचे उत्पादन करतील, असे पॉल यांनी सांगितले.

भारत बायोटेक कंपनीत महिन्याला १० कोटी डोस
भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनाची क्षमता वाढवत आहे. लवकरच आणखी ३ कंपन्या कोव्हॅक्सिनचे उत्पादन करतील. तसेच भारत बायोटेक आपल्या प्लांटची क्षमताही वाढवत आहे. यानुसार ४ कंपन्यांद्वारे कोव्हॅक्सिनचे प्रोडक्शन वाढवले जाईल. या व्यतिरिक्तही तीन सरकारी कंपन्यांच्या मदतीने डिसेंबरपर्यंत ४ कोटी डोसचे उत्पादन केले जाईल, अशी माहिती डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 3 =

Close