आजपासून पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार पैसे

Read Time:2 Minute, 36 Second

मुंबई : गेल्या काही दिवसांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना दिलासा म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून घरातील साहित्य, कपडे, भांडी खरेदीसाठी तात्काळ १० हजार रुपयांची मदत वाटप सुरू करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. आता ही रक्कम शुक्रवारपासूनच पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी पंचनाम्यानंतरच पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि प्राथमिक गरजा भागविण्यासाठी तात्काळ १० हजार रुपये पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारपासून थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. रोख रकमेचे वाटप केले तर अनेक आरोप होतात. पैशाचे वाटप बरोबर झाले नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचे नाही. त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत पुराचा फटका आणि नुकसानीचा आढावा घेण्यात आला. प्रचलित नियमापेक्षा अधिक मदत द्यावी, असा मंत्रिमंडळाचा सूर आहे. परंतु अद्याप काही ठिकाणी पुराचे पाणी कायम आहे. शेतीच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे पूर्ण पंचनाम्यानंतरच पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × three =