अर्थव्यवस्थेबाबत आकडेवारीत संभ्रम

Read Time:4 Minute, 33 Second

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा वेगाने वाढ होत असल्याची आकडेवारी समोर आली असली तरी या आकडेवारीसंदर्भातील काही महत्वाच्या पैलूंवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रकाश टाकला आहे. राजन यांनी सध्या झालेली वाढ ही अर्थव्यवस्थेमधील आहे की त्यामधील काही ठराविक घटकांमधील आहे हे पाहणे महत्वाचे असल्याचे म्हटले असून, यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे दर्शवणा-या गोष्टींबद्दलही राजन यांनी भाष्य केले आहे.

भारतामधील कारखान्यांमध्ये झालेल्या उत्पादनात पुन्हा वाढ झाल्याचे दाखवण्यात आले असे तरी ही आकडेवारी कशाच्या आधारे तयार करण्यात आली. हे सुद्धा ध्यानात घेतले पाहिजे असे राजन म्हणालेत. मात्र त्याचवेळी उद्योग पुन्हा रिकव्हरीच्या मार्गावर असल्याचेही राजन यांनी म्हटले आहे. मागील तिमाहीमध्ये आशियामधील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारी भारतीय अर्थव्यवस्था २०.१ टक्क्यांनी वाढलीय. उत्पादन आणि ग्राहकांनी खर्च करण्यास पुन्हा केलेली सुरुवात यामुळे ही सकारात्मक वाढ दिसून आली.

उत्पादन श्रीमंतांसाठीच वाढले
संपूर्ण अर्थव्यवस्थेने झेप घेतलीय की अर्थव्यवस्थेमधील काही घटकांनी पुन्हा झेप घेतली आहे?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, असा मुद्दा राजन यांनी उपस्थित केला. अर्थात उद्योगांनी चांगली कामगिरी केली. मात्र त्यामध्येही श्रीमंतांसाठी, उच्च मध्यम वर्गीयांसाठी आणि गरीबांसाठी निर्माण करण्यात आलेल्या वस्तू असे उत्पादनांचे स्वरुप असते हे लक्षात घ्यायला हवे, असे राजन यांनी म्हटले आहे. यासाठी राजन यांनी चारचाकी आणि दुचाकी विक्रीचे उदाहरण दिले. चारचाकी गाड्यांची विक्री वाढली आहे. तर दुचाकींच्या विक्रीत घट झाली.

छोट्या उद्योगांना मदत करण्यात टाळाटाळ
छोट्या कंपन्यांपेक्षा मोठ्या आणि अधिक फॉर्मल कंपन्यांना अधिक नफ्यातील वाढ मिळत असल्याचे निरीक्षणही राजन यांनी नोंदवले. आपल्याकडे अर्थव्यवस्था एका दबावामुळे फॉर्मलाइज होत आहे. आपण आपल्या देशातील छोट्या आणि मध्यम उद्योगांना इतर देश त्यांच्याकडील उद्योगांना देतात त्याप्रमाणे पाठिंबा दिलेला नाही. तुम्ही झटका पद्धतीने फॉर्मलायझेनश करता कामा नये. छोट्या आणि मध्यम उद्योगांमधील कंपन्यांना चांगल्या संधी उपलब्ध करुन देऊन फॉर्मलायझेशन करता येईल, मात्र मला आपल्याकडे हे होताना दिसत नाही, अशी खंत राजन यांनी व्यक्त केली.

सोने तारण ठेवणा-यांमुळे चिंतेत भर
अर्थव्यवस्थेचा लोकांवर होणारा परिणाम याबद्दल बोलताना भारतामध्ये सोने तारण ठेऊन कर्ज घेणा-यांची संख्या वाढल्याकडे राजन यांनी लक्ष वेधले. अगदीच कठीण परिस्थितीमध्ये भारतातील लोक आपल्या कुटुंबाकडील सोने तारण ठेवतात. अशापद्धतीने सोन तारण ठेवण्याचे प्रमाण वाढणे हे वापर कमी झाल्याचे लक्षण आहे, असे निरीक्षण राजन यांनी नोंदवले. अशा लोकांच्या मदतीसाठी थेट कॅश ट्रान्सफर अधिक योग्य ठरेल असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 + 12 =