अमेरिकेने दिल्या १५७ दुर्मिळ कलात्मक वस्तू

Read Time:5 Minute, 49 Second

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौ-यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. त्यासोबतच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर पंतप्रधानांनी संबोधनपर भाषणदेखील केले. या दौ-यात अमेरिकेने तब्बल १५७ दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तू पंतप्रधानांकडे सोपवल्या आहेत. यामध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचाही समावेश आहे. मोदींच्या ३ दिवसीय दौ-यादरम्यान या दुर्मिळ वस्तू अमेरिकेने दिल्या असून त्या आता पुन्हा भारतात आणल्या गेल्या आहेत.

या ऐतिहासिक कलाकृती चोरी आणि तस्करीच्या माध्यमातून अमेरिकेत गेल्या होत्या. या शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक वस्तू अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ऐतिहासिक वस्तूंचा अवैध कारभार आणि चोरी, तस्करी रोखण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यातील अर्ध्या कलाकृती सांस्कृतिक आहेत, तर अर्ध्यामध्ये हिंदू धर्म, बौद्ध, जैन धर्माशी संबंधित मूर्त्या आहेत. या ऐतिहासिक वस्तू पंतप्रधानांकडे सुपूर्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनीही अमेरिकेचे आभार मानले.

या १५७ वस्तूंमध्ये अनेक प्रकारच्या दुर्मिळ कलाकुसरीच्या गोष्टींचा समावेश आहे. यात दहाव्या शतकातील रेवंता यांचा तब्बल दीड मीटर लांबीचा बास रिलीफ पॅनल, तसेच १२ व्या शतकातील साडेआठ सेंटिमीटर उंचीची ब्राँझची नटराजनची मूर्तीदेखील आहे. शिवाय यातल्या साधारण ४५ कलाकुसरीच्या वस्तू या मध्ययुगीन काळातील आहेत. त्यात अनेक बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मूर्ती आहेत, तर निम्म्याहून अधिक कलाकुसरीच्या वस्तू या भारतीय संस्कृतीच्या द्योतक आहेत.

यातील अधिकाधिक कलाकृती ११ व्या शतकापासून १४ व्या शतकापर्यंतच्या आहेत. काही कलाकृती तर २ हजार ईसवीसन पूर्व आहेत. टेराकोटाची एक फुलदानी तर दुस-या शतकातील आहे. तसेच ४५ अवशेष ईसवीसन पूर्वच्या आहेत. कांस्य संग्रहात मुख्यत: लक्ष्मी नारायण, बुद्ध, विष्णू, शिव, पार्वती आणि २४ जैन तीर्थंकरांच्या प्रसिद्ध मुद्रांच्या अलंकृत मूर्त्या आहेत. तसेच पद्मासन तीर्थंकर, जैन चौबिसीसह अनाकार युगुल आणि ढोल वाजविणा-या महिलेची मूर्तीही आहे. तसेच टेराकोटाच्या ५६ कलाकृती आहेत. तसेच १८ व्या शतकातील एक मॅनसह तलवार आहे. त्यावर फारशी भाषेत गुरु हरगोविंद सिंह असे लिहिलेले आहे.

सर्व वस्तू, दगड, माती, धातूच्या
या सर्व वस्तू धातू, दगड आणि माती किंवा सिरॅमिकपासून बनवलेल्या आहेत. लक्ष्मी-नारायण, बुद्ध, विष्णू, शिव-पार्वती, २४ जैन तीर्थंकर, कनकलमूर्ती, ब्राम्ही, नंदिकेश अशा देवी-देवतांच्या ब्राँझच्या मूर्तींचा यात समावेश आहे. त्यासोबतच इतरही अनेक देवी-देवता आणि भारतीय पुराणातील व्यक्तिमत्वांच्या मूर्ती यात आहेत. याशिवाय या संग्रहामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांची प्रतिके असलेली अनेक दुर्मिळ शिल्पदेखील आहेत.

प्राचीन कलाकृती परत आणण्याची मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विदेशातील अनेक ऐतिहासिक कलाकृती भारतात आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतून या १५७ ऐतिहासिक कलाकृती भारतात आणल्या आहेत. यापुढेही इतर देशांतून भारतीय कलाकृती भारतात आणल्या जातील, असेही यावेळी सांगण्यात आले. १९७६ ते २०१३ पर्यंत विदेशातून केवळ १३ ऐतिहासिक वस्तू आणल्या गेल्या. मात्र, २०१४ पासून आतापर्यंत २०० पेक्षा जास्त वस्तू आणल्या आहेत, असेही सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + 10 =