
अमेरिकेचीही मास्कमुक्तीकडे वाटचाल…
न्यूयॉर्क : संपूर्ण जगभर कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. या संकटावर मात कशी करायची, असा यक्षप्रश्न जगापुढे असताना अमेरिकेनेही मास्कमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. देशात कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली आहे. ज्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे, तसेच ज्या लोकांपासून इतरांना संसर्गाचा धोका आहे, अशा लोकांसाठी अमेरिकेत प्राधान्याने कोरोना लसीकरण पूर्णत्वास नेले जात आहे. विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची लसीकरण मोहिमेत विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मोहिमेला चांगले यश मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता लस टोचून घेतलेल्या नागरिकांना घराबाहेर मास्कशिवाय फिरण्यास मुभा दिली आहे.
ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, त्या नागरिकांना मोठ्या गर्दीची ठिकाणे वगळता इतरत्र तोंडाला मास्क लावण्याची गरज नसेल. ज्या नागरिकांनी कोरोना लस टोचून घेतली नसेल ते नागरिकही काही परिस्थिती वगळता मास्कशिवाय बाहेर जाऊ शकतात. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राकडून आज हा महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. मागील वर्षभर कोरोना संसर्गामुळे नागरिकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. आता लसीकरणामुळे कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येण्याची चिन्हे आहेत. त्यात मास्कशिवाय फिरण्यास मुभा मिळाल्याने अमेरिकेच्या नागरिकांनी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेली जनजीवनाची घडी हळूहळू पूर्वपदावर येण्याची आशा पल्लवित झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना विषाणूने ५ लाख ७० हजार लोकांचा बळी घेतला आहे. [woo_product_slider id=”480″]