January 22, 2022

अनुदान उचलण्यासाठी बँके समोर शेतक-यांची गर्दी

Read Time:3 Minute, 35 Second

भोकर : तालुक्यात सध्या गेल्यावर्षी अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नासाडीचे अनुदान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतून मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेला शेतकरी वर्ग व महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून खुलेआम सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. कोणाच्या तोंडाला मास्क पण नाही. बँकेकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलीही व्यवस्था कार्यरत नसल्याने तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या शेतक-यांची जमिनीतील खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे ब-याच प्रमाणात संपत आल्यामुळे आता बी भरण, खते, औषधी याच्या काळजीत शेतकरी आहे. बँकेकडून नवीन पीक कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी अनेक मार्गांनी पैशाची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातच थोडाबहुत बुडत्याला काडीचा आधार म्हणल्या सारखे का होईना त्यास अतिवृष्टीचे अनुदान मिळाल्यामुळे ही रक्कम लवकर कशी मिळेल या प्रयत्नाने बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागला आहे.

पण सध्या कोरोना सारखी महाभयंकर बिमारीची साथ चालू असल्याने सर्वत्र लॉक डाउन चालू आहे. या लॉकडाऊन मध्ये कोरोना प्रतिबंधक नियमाचे सर्वांनी पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. या बँकेत मात्र शेतक-यांमध्ये ना सोशल डिस्टन्सची व्यवस्था, ना तोंडाला मास्क. त्यामुळे कोरोना महामारीचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुन्हा फैलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा बँक प्रशासनाने पोलिस विभागाची, महसूल विभागाची मदत घेऊन या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणणे अत्यंत अगत्याचे आहे.

याबाबत बँक व्यवस्थापक श्री चौधरी यांना विचारले असता त्यांनी आम्ही वेळोवेळी तहसीलदार साहेब तसेच पोलीस स्टेशन यांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत मागितली. पण कोणीच आम्हाला या ठिकाणी येऊन मदत करायला तयार नाही. त्यामुळे आमचा नाईलाज आहे. कारण बँकेत फक्त तीन कर्मचारी कामावर आहेत. तसेच आम्हाला राहिलेल्या सर्व गावाचे अनुदान २ जून पूर्वी वाटप करा असे आदेश वरिष्ठांनी दिल्यामुळे आमचा कोणताही कर्मचारी बाहेर येऊन थांबू शकत नाही त्याला आमचा नाईलाज आहे. ज्याचे रक्षण त्याने करावे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − 10 =

Close