January 19, 2022

अनिल देशमुख यांना धक्का

Read Time:2 Minute, 36 Second

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैशांच्या गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) गेल्या अनेक दिवसांपासून नोटीस बजावत आहेत. त्यांच्या निवासस्थानी छापेमारीदेखील करण्यात आली. परंतु ते चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नव्हते. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख यांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने समन्स रद्द करण्यास नकार दिला. तसेच अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात जाण्याची सूचना दिली.

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याकाठी १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंग यांनी पत्रात केला. तसेच देशमुख हे पोलिस कामकाजातही सतत ढवळाढवळ करत होते, असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असून, त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

याप्रकरणी परमबीर सिंग यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. सिंग यांच्या पत्राचा हवाला देत ऍड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने सीबीआयला दोन आठवड्यांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.काही महिन्यांपूर्वी सीबीआयने देशमुख यांना समन्स बजावल्यानंतर ते चौकशीसाठी हजरही राहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + eighteen =

Close