January 21, 2022

अनिल देशमुख यांच्या घरावर आयकरचे छापे

Read Time:3 Minute, 2 Second

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातील त्यांच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोलमधील त्यांच्या घरी दाखल झाले आणि त्यांच्या घरी, त्यांच्या हॉटेलवर आणि इतर ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकून तपास सुरू केला.

यासंदर्भात ईडीदेखील अनिल देशमुख यांची चौकशी करत असून त्यात आता आयकर विभागाचीदेखील त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, छापा टाकण्यासाठी आयकर विभागाची पथके नागपूरमधील नसून बाहेरून आल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाने नागपूरमधील अनिल देशमुख यांच्या घरासोबतच नागपूर विमानतळाजवळील त्यांचे हॉटेल, सोयाबीन केकची फॅक्टरी, एनआयटी कॉलेजमध्येदेखील आयटीच्या पथकाने छापेमारी केली. यासोबतच त्यांच्या तीन भागीधारांपैकी काद्री आणि भटेवार यांचीदेखील आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.

परमबीरसिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्या घरी आणि इतर संबंधित ठिकाणी छापेमारी केली होती. आता आयकर विभागाकडूनही त्यांच्या घरासह ६ ठिकाणी छापेमारी केली. दरम्यान, गुरुवारी १६ सप्टेंबर रोजी अनिल देशमुख यांचे गृहमंत्री असतानाचे खासगी सचिव आणि अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांनाही निलंबित करण्यात आले.

ईडीने अनेकदा बजावले समन्स
याआधी ईडीकडून अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, अनिल देशमुख चौकशीसाठी अद्याप हजर न राहिल्याने ईडीनें त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − fifteen =

Close