अनाथांचे मातृछत्र हरपले, सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराने निधन

Read Time:2 Minute, 40 Second

पुणे : अनाथांसाठी सेवाकार्य करणा-या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणा-या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (७३) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांचे रात्री ८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले.

महिनाभरापूर्वी सिंधुताई सपकाळ यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार तर २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जेमतेम चौथीपर्यंत झालेल्या सिंधुताई यांचे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झाले होते. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवले. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी १९९४ मध्ये पुरंदर तालुक्यात कुंभारवळण येथे ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत. त्यामुळे अनाथांची माय हरपल्याची भावना सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen + 18 =