August 19, 2022

अनधिकृत बांधकाम प्रकरणी आता राणा दाम्पत्याला नोटीस

Read Time:3 Minute, 11 Second

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार आली असून त्याची मुंबई महापालिकेकडून तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयाकडून यास दुजोरा देण्यात आला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांचे खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करण्यात आले आहे. पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशाप्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे. बुधवार, दि. ४ मे रोजी मुंबई महापालिकेचे पथक तपासणीसाठी या इमारतीत जाणार आहे.
पालिकेच्या वांद्रे एच पश्चिम विभागाचे सहाय्यक विनायक विसपुते यांनी या माहितीस दुजोरा देताना अधिक तपशील दिला. इमारतीतील अनेक घरांमध्ये अवैध बांधकामे करण्यात आली असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. त्यानुसार काही घरांना याआधी नोटिसा पाठवल्या आहेत. तशीच नोटीस राणा दाम्पत्याच्या घरालाही पाठवली आहे आणि घराची तपासणी करून आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत, असे विसपुते यांनी नमूद केले.

दरम्यान, नवनीत आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी अमरावती येथून मुंबईत दाखल झाल्यानंतर हे दाम्पत्य खार येथील घरातच वास्तव्याला होते. याठिकाणी शिवसैनिकांनी धडक दिल्यानंतर तणाव पसरला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याने माघार घेतली होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईपासून त्यांची सुटका झाली नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. गेल्या दहा दिवसांपासून राणा दाम्पत्य कोठडीत आहे. अशावेळी मुंबई पालिकेच्या नोटीसने या दोघांपुढे नवे संकटच उभे ठाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 + 9 =

Close