
अदानी ग्रुपचे शेअर गडगडले…
मुंबई : मागील वर्षभर तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या अदानी समुहातील सर्वच शेअरसाठी आजचा दिवस घातवार ठरला. एका वृताने अदानी समूहातील शेअर्सचा घात केला आणि उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा आर्थिक फटका बसला. आजच्या अनपेक्षित पडझडीने गौतम अदानी यांना तासाभरात ७३००० कोटींचे (१० अब्ज डॉलर) नुकसान सहन करावे लागले, तर गुंतवणूकदारांचे एक लाख कोटींचे नुकसान झाले.
अदानी समूहातील विविध कंपन्यांमध्ये एकूण ४३५०० कोटींची गुंतवणूक करणा-या अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर भांडवली बाजारात आज सोमवारी अदानी समूहातील शेअरमध्ये मोठी पडझड झाली. याची मोठी किंमत आज गौतम अदानी यांनादेखील चुकती करावी लागली.
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार गत शुक्रवारी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ७७ अब्ज डॉलर्स ( ५.६४ लाख कोटी) इतकी होती. त्यात आज अदानी यांनी जवळपास १० अब्ज डॉलर्स गमावले आहेत. त्याशिवाय अदानी समूहाच्या बाजार भांडवलातदेखील आज प्रचंड घट झाली. शुक्रवारी अदानी समूहाचे एकूण बाजार भांडवल ९.५ लाख कोटी होते. त्यात आज १ लाख कोटींची घसरण झाली आहे.
पहिल्यांदाच मोठी घसरण
अदानी ग्रुपमधील ४३५०० कोटींची गुंतवणूक रडारवर, असे वृत्त बाजारात धडकल्यानंतर गुंतणूकदारांनी अदानी समूहातील शेअरची चौफेर विक्री सुरू केली. ज्यामुळे अदानी एन्टरप्राइजेसचा शेअर २० टक्क्यांनी कोसळला होता. तसेच अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी गॅस यांच्यात ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि तिन्ही शेअरला लोअर सर्किट लागले. अदानी एन्टरप्राइजेसचा शेअर दिवसभरात २५ टक्क्यांपर्यंत कोसळला होता. मात्र त्यानंतर तो सावरला आणि ६.२५ टक्क्यांच्या घसरणीसह १५०१ रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्ट्सचा शेअर ८.५ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.