
अट्टल मोबाईल चोरट्यास पकडले
नांदेड : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसर, डॉक्टर लेनमधील वेगवेगळ्या रुग्णालयांमधून सकाळच्या वेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईक गाढ झोपेत असताना त्यांचे मोबाईल व किंमती सामान चोरी जात होते.या चो-या करणा-या अट्टल चोरटयाला वजिराबाद पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना पोलिस ठाण्याच्या हद्दीत व मोबाईल चोरीच्या घटनांवर आळा घालून आरोपींना अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या.या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने डॉ. लाईन भागांमध्ये सापळा रचून गुन्हेगारांचा शोध घेणे सुरु केले. दि.१० जुलैच्या रात्री मोबाईल चोर रेल्वे स्टेशन येथे असून तो चोरीचे मोबाईल घेऊन हैदराबाद येथे जात असल्याचे माहिती पथकातील फौजदार प्रविण आगलावे यांना मिळाली. माहिती समजताच त्यांनी त्याठिकाणी जाऊन राजू देविदास वाघमारे रा. बळीरामपूर याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पाच चोरीचे अँड्रॉइड मोबाईल मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. तेरा अँड्रॉइड मोबाईल, एक सोन्याची साखळी, दोन कानातील टॉप्स, दोन अंगठ्या असा एकूण एक लाख ७६ हजार ४५८ रुपयांचा ऐवज पोलिसांना त्याने काढून दिला.
वजिराबाद पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, सिद्धेश्वर मोरे, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील प्रवीण आगलावे, दत्ताराम जाधव, विजयकुमार नंदे, गजानन किडे, मनोज परदेशी, चंद्रकांत बिराजदार, संतोष बेलरोड, वेंकट गांगुलवार, बालाजी कदम, शेख इब्राहिम, शरदचंद्र चावरे यांनी केले.
आठ लाखाचे मोबाईल शोधले
मागच्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणावरून मोबाईल गहाळ झाल्याच्या नोंदी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्या होत्या, यातील गहाळ झालेले जवळपास ८ लाख रुपये किंमतीचे ५१ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले असून, या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्ह्यात महागडे मोबाईल गहाळ झाल्याच्या नोंदी दररोज विविध पोलिस ठाण्यात दाखल होत आहेत. दिवसेंदिवस दिवस आशा घटनात वाढ होत असल्याने पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सदरील गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून सदरील कामी एक पथक गठीत करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला असता वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८, भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ , विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५, इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत३, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६ व कंधार, देगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक-एक असे गहाळ झालेले ८ लाख १ हजार ९०० रुपये किंमतीचे ५१ मोबाईल सदरील पथकाने शोधून काढले.
सदरील कार्यवाही पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सूचनेवरून सपोउपनि गोविंद मुंडके, पोहेकॉ शेख चांद, पोहेकॉ गंगाधर कदम, पोहेकॉ सखाराम नवघरे, संजय केंद्रे, दशरथ जांभळीकर, पोना विश्वनाथ इंगळे, बालाजी तेलंग, पोकॉ विठ्ठल शेळके, बजरंग बोडके, गणेश धुमाळ, विलास कदम, पोना राजू सीटीकर , ओढणे आदींच्या पथकाने कामगिरी यशस्वी पार पाडली. सदर पथकाचे कामाबद्दल पोलिस अधीक्षक शेवाळे यांनी कौतुक केले आहे.