अग्निपथ प्रकरणी चर्चेस तयार

Read Time:3 Minute, 5 Second

गरज पडल्यास बदल करणार : अनुराग ठाकूर
नवी दिल्ली : लष्कर भरतीसंदर्भात केंद्र सरकारच्या योजनेच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी अग्निपथ योजनेबाबत मोठे वक्तव्य केले असून, या योजनेला विरोध करणा-या तरुणांना हिंसाचार थांबविण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सरकार या मुद्यावर चर्चेस तयार आहे. या चर्चेसाठी तरुणांनी पुढे यावे, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकार खुल्या मनाने त्यांच्या तक्रारी ऐकण्यास आणि आवश्यकता भासल्यास बदल करण्यास तयार आहे. अग्निपथ योजना नरेंद्र मोदी सरकारद्वारे भविष्यात देशाला अधिक सुरक्षित बनविण्यासाठी आणि देशातील तरुणांना संधी देण्यासाठी घेण्यात आलेला ऐतिहासिक निर्णय आहे, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.

आंदोलनामुळे ३६९ रेल्वेगाड्या रद्द
नवी दिल्ली : सशस्त्र दलात भरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध लक्षात घेता रेल्वेने शनिवारी ३६९ गाड्या रद्द केल्या. रेल्वे अधिका-यांनी ही माहिती दिली. अधिका-यांनी सांगितले की, रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये २१० मेल एक्स्प्रेस आणि १५९ पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. रेल्वेने दोन मेल एक्स्प्रेस अंशत: रद्द केल्या आहेत. त्यामुळे रद्द झालेल्या गाड्यांची एकूण संख्या ३७१ आहे.

सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध करणा-या आंदोलकांनी रस्ते आणि रेल्वे मार्ग रोखले आणि रेल्वेचे डबे पेटवून दिले. बिहारमध्ये शनिवारी आंदोलनाच्या समर्थनार्थ बंद पुकारण्यात आला होता. सध्याची परिस्थिती पाहता बिहारमधील ३२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्रात मनमाड रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी मनमाड-सिकंदराबाद अजंठा एक्स्प्रेस, श्री साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून सुटणारी श्रीसाईनगर शिर्डी-सिकंदराबाद गाडी आणि पाटणावरून सुटणारी पटना-पूर्णा गाडी रद्द करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

four × four =