अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत


· बाल विवाह होणार नाहीत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विभागांना निर्देश

· ग्रामीणसाठी ग्रामसेवक तर शहरात बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अधिकार

नांदेड :- अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्वाचा समजला जाणारा मुहूर्त उद्या 10 मे रोजी आहे. या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह लावले जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. तसेच बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास चाईल्ड हेल्प लाईन 1098 ला तात्काळ माहिती देण्याचेही आवाहन त्यांनी केले.

 

भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक प्रक्रीया आहे. साहजिकच शुभ मुहूर्तावर विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठया प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात प्रशासनाकडून सर्व संबंधित विभागांना निर्देश जारी केले आहेत. बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे विवाह बेकायदेशिर ठरतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महिला व बाल विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक नियुक्त असून शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागात अंगणवाडी पर्यवेक्षिका नियुक्त केल्या आहे. बालविवाह रोखणे आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न सर्वांनी करणे आवश्यक आहे.बालविवाह उघडकीस आल्यास पालकांपासून तर सर्वच सहभागी आरोपी ठरविले जातात त्यामुळे अशा प्रकरणात समाजातील सर्व सुशिक्षितांनी लक्ष वेधून असावे. समाजातील ही प्रथा बंद करण्यासाठी पुढे यावे , असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या अधिकार क्षेत्रात बालविवाह होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात व असे बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यास त्यावर तातडीने आवश्यक ती कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील संबंधित विभागांना दिले आहेत.


Post Views: 25


Share this article:
Previous Post: स्थानिक गुन्हा शाखेत सहाय्यक पोलीस निरिक्षक शेकडे, पोलीस उपनिरिक्षक सोनकांबळे आणि पुयड; कुंडलवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक मस्के

May 9, 2024 - In Uncategorized

Next Post: ठेवीदारांची पावने दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीाला शोधू देणाऱ्यास 1 लांखाचे बक्षीस नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेचे जनतेला आवाहन

May 9, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.