अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्टला सीईटी

Read Time:3 Minute, 48 Second

राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारीख अखेर आज जाहीर झाली आहे. २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना २० जुलै (उद्या) रोजी सकाळी ११.३० वाजेपासून २६ जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

राज्यात काही दिवस अगोदरच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी इयत्ता ११ वीची सीईटी द्यावी लागणार आहे. या सीईटीच्या आधारेच विद्यार्थ्यांना विविध नामांकीत महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहे. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील, त्यांना हॉल तिकीटदेखील ऑनलाईन मिळणार आहेत. १०० गुणांची ही परीक्षा असणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. १०० गुणांच्या या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल, असे सांगण्यात आले.

परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश
सीईटी परीक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

महत्त्वाचे मुद्दे
-राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी १७८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
-अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार
-राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिळए जाणार
-सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार असून, १०० गुणांसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी या विषयांचे प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारले जातील.
-परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून, ओएमआर पद्धतीने घेतली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

seven − one =